नगर दर्शन (वृत्तसेवा):- महाविद्यालयांमध्ये पालक तुम्हाला कष्टाने पाठवितात त्यांचा मान राखा, त्यांचे नाव मोठे करुन, तुमच्यातील गुणात्मक शौर्य सिध्द करा. प्रत्येकामध्ये एक शुर योध्दा असतो. त्याला योग्यवेळी बाहेर काढणे गरजेचे असते. वाईट विचारांवर चांगल्या विचारांनी मात करणे हे सुध्दा एक प्रकारचे शौर्य असल्याचे प्रतिपादन ऑपरेशन सिंदुर मध्ये यशस्वी काम करणारे इंडियन एअर फोर्सचे विंग कमांडर देवेंद्र औताडे यांनी केले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ विंग कमांडर देवेंद्र औताडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ऑपरेशन सिंदुर मध्ये यशस्वी कामगिरी केल्याबद्दल तसेच त्यांना राष्ट्रपतींकडून शौर्य पदक मिळाल्याबद्दल प्रवरा परिवाराच्या वतीने देवेंद्र औताडे यांचा सत्कार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयात गुणवत्ता यादीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान देवेंद्र औताडे यांच्या हस्ते करण्यात आला.
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, गणपतराव औताडे, रामभाऊ औताडे, परशुराम आदिक, बाबासाहेब चीडे, नानासाहेब शिंदे, कैलास तांबे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी आधिकारी शिवानंद हिरेमठ, प्राचार्य संजय गुल्हाने यांच्यासह विद्यार्थी आणि पालक याप्रसगी उपस्थित होते
देवेंद्र औताडे म्हणाले की, मी शेतकरी कुटूंबातील असलो तरी, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर सैन्यदलात दाखल झालो. परंतू यासाठी कष्ट घ्यावे लागले. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनीमध्ये चौथ्या क्रमांकाने माझी निवड झाली. अतिशय खडतर पध्दतीने तिथे प्रशिक्षण घेवून सैन्य दलातील पुढच्या वाटचालीसाठी मी कार्यरत झालो. ग्रामीण भागातील विद्यार्थी म्हणून स्वत:ला कमी समजू नका. शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही आपण मागे टाकू शकतो ही क्षमता तुमच्यामध्ये निश्चित आहे.
ऑपरेश सिंदुर यशस्वी झाल्यानंतर अचानक राष्ट्रपती भवनातून एक दिवशी दुरध्वनी आला आणि त्यांनी शौर्यपदक जाहीर झाल्याचे सांगितल्यानंतर त्या युध्दातील सर्व क्षण आठवले. देशासाठी आपण काही तरी करु शकलो याचे समाधान खुप मोठे होते. आम्ही सैन्य दलात काम करणारी माणसं अशा पध्दतीचे शौर्य दाखवू शकतो पण शौर्य फक्त लढाईमध्ये नाही तर, वाईट विचारांवर चांगल्या विचारांनी मात करणे असे सुध्दा आहे. तुम्हा विद्यार्थ्यांमध्ये सुध्दा गुणवत्तेचे शौर्य नक्की आहे. ते तुम्ही सिध्द करा. महाविद्यालया मध्ये असलेली शिस्त पाळा असे आवाहन त्यांनी केले.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवेंद्र औताडे यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतूक करुन, आज तुमच्या स्वागताच्या कार्यक्रमास त्यांना विशेष निमंत्रीत केले. देशाप्रती त्यांनी दाखविलेल्या कर्तबगारी बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी प्रवरा परिवाराला मिळाली. एक आपल्या भागातील व्यक्ती एवढे मोठे आव्हान यशस्वीपणे यशस्वी करुन दाखवितो हा अहिल्यानगरचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची वाटचाल ही एका विचारांवर आधारित सुरु आहे. आज या संस्थेतून दिड लाखांहून अधिक माजी विद्यार्थी ५६ देशामध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. संस्थेने नेहमीच गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे. संस्थेतील प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून होत असलेल्या चांगल्या कामांमुळेच विद्यार्थ्यांना चांगले प्लेसमेंट देणारी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था ही महाराष्ट्रात अग्रस्थानी असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही विद्यार्थी आता प्रवरा परिवारामध्ये आला आहात. तुमचे पालकत्व आम्ही स्विकारले आहे. महाविद्यालयातील शिस्त पाळा, पालकांनी मोठ्या अपेक्षेने तुम्हाला येथे पाठविले आहे. तुमच्या माध्यमातून त्यांनी पाहीलेले स्वप्न पुर्ण करण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, पाचार्य डॉ.संजय गुल्हाणे यांच्यासह विद्यार्थी आणि पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, गणपतराव औताडे, रामभाऊ औताडे, परशुराम आदिक, बाबासाहेब चीडे, नानासाहेब शिंदे, कैलास तांबे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी आधिकारी शिवानंद हिरेमठ, प्राचार्य संजय गुल्हाने यांच्यासह विद्यार्थी आणि पालक याप्रसगी उपस्थित होते.
