प्रवरानगर येथे वाळू वाहतूक करणारा डंपर पलटी; मोठी दुर्घटना टळली

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- प्रवरानगर कारखाण्यासमोर भरधाव वेगात जाणारा वाळू वाहतूक करणारा डंपर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी काही काळ परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यावर वाळू पसरल्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली होती.

राहता तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर वाळू व मुरूम वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. या वाहतुकीपैकी अनेक वाहने अवैध असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने होत असून, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर डंपर प्रवरानगर परिसरात आल्यानंतर तहसील कार्यालयाशी संबंधित ‘सदाफळ’ नावाच्या व्यक्तीने तो अडवल्याची चर्चा आहे. मात्र त्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई न करता मोठी तोडपाणी करून डंपर सोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

आरटीओ, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात ही वाहतूक सुरू असताना, अवैध वाळू वाहतुकीवर कठोर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.

या संपूर्ण घटनेची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काही जागरूक नागरिकांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!