साकळाई योजनेला १५ दिवसांत सुरुवात; लाभक्षेत्रातील गावांना दुष्काळमुक्त करण्याची ग्वाही — ना. राधाकृष्ण विखे पाटील

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- येत्या पंधरा दिवसांत साकळाई पाणी योजनेच्या कामाला सुरुवात करून लाभक्षेत्रातील गावांना दुष्काळमुक्त करण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तालुक्यातील सारोळे कासारा येथे सुमारे ३ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण त्यांच्या उपस्थितीत पार पडले.

साकळाई योजनेचे काम पूर्ण करून स्व. शिवाजीराव कर्डीले यांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगत ना. विखे म्हणाले की, या भागातील नागरिकांनी वर्षानुवर्षे पाण्याची वाट पाहिली. महायुती सरकारने योजनेला पूर्ण मंजुरी दिली असून पुढील १५ दिवसांत काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे सारोळे कासारा येथील २९५ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार असून १३ बंधाऱ्यांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

ग्रामीण विकासातूनच देशाचा विकास साधता येतो, ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘विकसित भारत – जी-राम-जी’ योजनेतून प्रत्येक गावाला ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून १२५ दिवसांच्या रोजगारनिर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. मोफत धान्य योजना व लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कुकडी कालव्याच्या कामांसाठी ४०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून कामे पूर्ण झाल्यावर आवर्तनाचा ४० दिवसांचा कालावधी कमी होईल. शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठ्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील गुंतवणूक, संरक्षण उत्पादन केंद्र, दळणवळण आणि औद्योगिक विकास यामुळे युवकांच्या रोजगाराला चालना मिळेल, असेही ना. विखे यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर–पुणे ग्रीनफिल्ड मार्ग व औद्योगिक जोडणीमुळे जिल्ह्याचा कायापालट होईल.

यावेळी घोसपुरी येथे माजी सैनिकांनी उभारलेल्या कमानीचे लोकार्पण करण्यात आले. राष्ट्र प्रथम ही भावना जोपासली पाहिजे, असे सांगून जिल्ह्यात सैनिक स्मारक उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उद्योजक दिलीप दाते, सरपंच सौ. आरती कडूस, रविंद्र कडूस, सौ. योगिता निंभोरे, सरपंच किरण साळवे, संतोष खोबरे, दादाभाऊ चितळकर, रंगनाथ निमसे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!