नगर दर्शन (वृत्तसेवा):- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77 व्या वर्धापनदिनानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पोलीस मुख्यालय मैदानावर उत्साहात पार पडला. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांच्या सहकार्यातूनच बलशाली व आत्मनिर्भर भारताची निर्मिती होऊ शकते. जातीय व सामाजिक विषमता दूर करून दारिद्र्य निर्मूलनासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असून, ‘मी भारताचा नागरिक आहे’ ही ओळख अधिक दृढ होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राचे नवे पर्व सुरू होत आहे. शिर्डी औद्योगिक क्षेत्रात सुमारे 2 हजार कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणुकीतून मोठा उद्योग प्रकल्प उभारण्यात येत असून, त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या धोरणातून देशाची प्रगती सुरू असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प केला असल्याचे त्यांनी सांगितले. दावोस येथील गुंतवणूक परिषदेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करार झाले असून, त्यातून लाखो रोजगार निर्मिती होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सोहळ्याला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस दल, गृहरक्षक दल, विविध शासकीय पथकांचे भव्य संचलन पार पडले. तसेच शहरातील सुमारे 25 शाळांमधील 5 हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर सामूहिक कवायत सादर करून राष्ट्रभक्तीचा जागर केला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिक, विद्यार्थी आणि अधिकारी यांनी बालविवाह विरोधी शपथ घेतली. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता झाली.







