नगर दर्शन (वृत्तसेवा):- शहराजवळील संगमनेर खुर्द येथे सुरज सूर्यभान शिंदे (वय 36) या युवकाचा गुरुवारी रात्री झालेला संशयास्पद मृत्यू अपघात की घातपात, याबाबतचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. घटनेनंतर 48 तास उलटून गेले तरी नेमके कारण स्पष्ट न झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास स्कुटीची धडक लागून एक व्यक्ती जखमी झाली. त्यानंतर सुरज शिंदे यांना काही जणांनी बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप समाज बांधवांनी केला आहे. या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ वैदू समाज आक्रमक झाला असून, आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. जोपर्यंत सुरज शिंदे यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेत मागील सुमारे 18 तासांपासून समाज बांधव आणि कुटुंबीयांनी मृतदेहासह शहर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे.
“गरीबांना न्याय मिळणार की नाही? आरोपींना कोण पाठीशी घालत आहे?” असा सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.






