नगर दर्शन (वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील लोणी येथे मंगळवारी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास राजमाता जिजाऊ चौकामध्ये तळेगाववरून नगरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर आणि एका चारचाकी वाहनाचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
दरम्यान, याच वेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या निवासस्थानी जात असताना त्यांच्या निदर्शनास हा अपघात आला. त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवून अपघातस्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. अपघातग्रस्तांची विचारपूस करत त्यांनी स्थानिक नागरिकांकडून अपघात कशामुळे झाला याची माहिती घेतली.
स्थानिक नागरिकांनी मंत्री विखे पाटील यांना सांगितले की राजमाता जिजाऊ चौकातील गतिरोधक पूर्णपणे काढून टाकण्यात आल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. वाहनांचा वेग नियंत्रणात राहत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांची समस्या ऐकून घेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने चौकात नवीन गतिरोधक तयार करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.







