लोणी बुद्रुकचा अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प राज्यातील विकसित होत असलेल्या गावांसाठी आदर्श – ना. राधाकृष्ण विखे पाटील

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने विकसित केलेला अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प राज्यातील विकसित होत असलेल्या गावांसाठी एक आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वास जलसंपदा तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

गोगलगाव येथे लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यान्वित करण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्पाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील, डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, चेअरमन नंदूशेठ राठी, व्हा. चेअरमन सोपान शिरसाठ, प्रवरा बँकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, सरपंच कल्पना मैड, दत्तात्रय राजभोज, भाऊसाहेब खाडे, अनिल विखे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुमारे चार कोटी रुपयांच्या खर्चातून अत्याधुनिक स्वरूपात उभारण्यात आलेला हा घनकचरा प्रकल्प ग्रामपंचायत स्तरावर उभारलेला पहिलाच प्रकल्प असून, ग्रामीण भागातील हा एक यशस्वी प्रयोग आहे. विकसित होत असलेल्या गावांसाठी तो आदर्श ठरेल, असे मंत्री विखे पाटील यांनी नमूद केले.

ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला, याबद्दल समाधान व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, शहर व ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता कचऱ्याची समस्या भविष्यात मोठे आव्हान ठरणार आहे. मात्र नव्या तंत्रज्ञानाची जोड दिल्याने हा प्रकल्प अधिक सक्षम करण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्यात येतील.

लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने शासनाच्या सर्व योजना व धोरणांची प्रभावी अंमलबजावणी माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील यांच्या पुढाकारातून केल्यामुळे राज्य व देश पातळीवरील पुरस्काराने ग्रामपंचायतीचा सन्मान झाला असून, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोणी बुद्रुक गावात विकसित करण्यात आलेले मटण मार्केट सर्व सुविधांनी परिपूर्ण असून, दोन एसटीपी प्लांट उभारण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

यावेळी चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रकल्पाच्या उभारणीचा सविस्तर आढावा घेतला. या प्रकल्पामुळे कोणत्याही गावाला त्रास होणार नाही. नागरिकांकडील कचरा संकलनापासून ते प्रक्रिया केंद्रापर्यंतच्या सर्व टप्प्यांवर प्रशिक्षण दिले जाणार असून, कचऱ्यापासून तयार होणारे खत स्थानिक शेतकऱ्यांना कमी दरात उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!