प्रवरानगर जि.प.शाळेचे सहा विद्यार्थी सैनिकी शाळेसाठी पात्र

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- प्रवरानगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. या यशामुळे शाळेचा तसेच गावाचा नावलौकिक वाढला आहे.

यंदाच्या ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत शाळेतील सहा विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये आदर्श उनवणे, मनिष कानडे, अनुराग डोंगरे, पवन गोरे, अथर्व गोल्हार आणि आदित्य वाघमारे यांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात मर्यादित सुविधा असतानाही विद्यार्थ्यांनी जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यामुळे तालुक्यात सर्वत्र त्यांच्या यशाचे कौतुक होत आहे.

शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन

या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक नामदेव फटांगरे तसेच शिक्षक मनिषा गावडे, मनिषा सपकाळे आणि महादेव कानडे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्यासाठी शिक्षकांनी १५ मेपासून नियमित अतिरिक्त वर्ग, सराव चाचण्या आणि वैयक्तिक मार्गदर्शन दिले. तसेच QR कोड गुणवत्ता उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासाची वेगळी पद्धत उपलब्ध करून दिली.

‘मिशन आरंभ’ उपक्रमाचा फायदा

जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन आरंभ’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नियमित सराव परीक्षा देण्याची संधी मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.

मान्यवरांकडून अभिनंदन

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तसेच शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी अभिनंदन केले.

तसेच जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

याशिवाय राहाता तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू कांबळे आणि केंद्रप्रमुख कानिफनाथ कोळेकर यांचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना लाभले.

सध्या शाळेत आनंदाचे वातावरण असून हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!