नगर दर्शन (वृत्तसेवा):- लोणी पोलिस स्टेशन हद्दीतील ममदापूर गावात सुरू असलेल्या बेकायदा गोवंश कत्तलीवर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ मार्च २०२६ रोजी ममदापूर येथे गोवंशाची बेकायदा कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर लोणी पोलिसांनी तत्काळ छापा टाकला. छाप्यात रेहान महंमद अय्युब कुरेशी (वय अंदाजे ३१) याच्याकडून सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीचे सुमारे ८०० किलो गोमांस जप्त करण्यात आले.
तसेच गावाच्या हद्दीतून संशयित इको कार (क्र. MH-04-DJ-8129) मधून सुमारे ३०० किलो गोमांस व सुमारे ५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ७ लाख २० हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी रेहान महंमद अय्युब कुरेशी, मेहमूद अय्युब कुरेशी आणि इतर दोघांविरुद्ध लोणी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ९०/२०२६ अन्वये भारतीय दंड संहिता कलम २७१, ३२५, ३५१(२), ३५१(३)(अ)(३)(५) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ व ९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग तसेच लोणी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी आरोपींचा शोध घेतला जात आहे.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून बेकायदा कत्तलीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.






