अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे केंद्र होणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने अहिल्यानगर जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणुकीला मोठी चालना मिळत आहे. जिल्ह्याला औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र बनविण्यासाठी आवश्यक कामे निश्चित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील शिर्डी, राहुरी आणि श्रीगोंदा तालुक्यात औद्योगिक वसाहती उभारण्याबाबत मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत औद्योगिक विकासासाठी असलेल्या अडचणी दूर करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीबरोबरच राहुरी आणि श्रीगोंदा तालुक्यातील औद्योगिक प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच राहुरी तालुक्यातील कृषी विद्यापीठाची काही जागा औद्योगिक विकासासाठी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.

या औद्योगिक वसाहती उभारल्या गेल्यास अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात वाढत असलेल्या औद्योगिक गुंतवणुकीचा जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे. औद्योगिक विस्तारामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!