नगर दर्शन (वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील बाभळेश्वर परिसरात सात वर्षीय अल्पवयीन मुलीशी कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेची सात वर्षीय मुलगी २९ जून रोजी सायंकाळी घराजवळील मैदानात खेळत असताना संबंधित व्यक्तीने तिला बोलावून बाजूला नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधिताने मुलीशी अयोग्य वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घरी परतल्यानंतर मुलगी रडत असल्याचे पाहून आईने विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी संबंधित व्यक्तीकडे जाब विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर व्यक्ती काही वेळाने बाहेर आल्यानंतर त्याने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली तसेच त्यानंतर सदर व्यक्तीने आम्हाला शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांनी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी संजय जोसेफ पंडित याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५(२), ३५१(२), ३५२ तसेच POCSO कायद्यातील कलम ८, ११ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करून सदर आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घटनेचा तपास हा लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी करत आहेत.
टीप :- सदर वृत्त हे पोलिसांकडे दाखल झालेल्या प्रथम माहिती अहवाल (FIR) आणि फिर्यादीतील आरोपांवर आधारित आहे. संबंधित आरोपीचा दोष न्यायालयात सिद्ध होईपर्यंत त्यांना कायद्यानुसार निर्दोष मानले जाते.






