नगर दर्शन (वृत्तसेवा):- राज्यभर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळत असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ६ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईत सततच्या पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले असून रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. काही ठिकाणी रस्ते खचल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस सुरू असून प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर कार्यरत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे, शक्यतो घराबाहेर न पडण्याचे आणि हवामान विभाग तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
यंदा जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने चिंतेचे वातावरण होते. मात्र जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार पुनरागमन करत अनेक भागांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, सातारा आणि पुणे घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, रायगड, नाशिक, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर, वाशिम, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून सर्व जिल्हा प्रशासनांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने नागरिकांना पूरग्रस्त भाग, नदी-नाले, धबधबे आणि पाणी साचलेल्या रस्त्यांपासून दूर राहण्याचे, अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळण्याचे तसेच कोणतीही अफवा न पसरवता अधिकृत सूचना आणि हवामान विभागाच्या इशाऱ्यांवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






