लोणीत चालत्या ओमनी कारला आग; प्रवरा मेडिकलच्या सुरक्षा रक्षकांनी वाचवले प्रवाशांचे प्राण

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- लोणी परिसरात शुक्रवारी (दि. ३ जुलै) सायंकाळच्या सुमारास एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. संगमनेरहून राहुरीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका चालत्या ओमनी कारला अचानक आग लागली. ही घटना प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या गेट क्रमांक २ समोर घडली. मात्र, गेटवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे गाडीतील महिला, लहान मुले व पुरुषांना वेळेत बाहेर काढण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०४ सीजे १२९० क्रमांकाची ओमनी कार प्रवास करत असताना अचानक वाहनाच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. काही क्षणांतच गाडीतून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या गेट क्रमांक २ वरील सुरक्षा रक्षकांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाचारण केले. त्यांनी सर्वप्रथम गाडीत अडकलेल्या महिला, लहान मुले आणि पुरुषांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर संस्थेच्या अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवत काही मिनिटांतच आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

या बचावकार्यात फायर ऑफिसर विकास माळी, ए. व्ही. शेळके, जी. डी. कांगणे आणि सुपरवायझर जे. पी. शेख यांनी अत्यंत धाडस, तत्परता आणि प्रसंगावधान दाखवत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या वेळेवर केलेल्या कार्यवाहीमुळे वाहनातील सर्व प्रवाशांचे प्राण वाचले.या धाडसी कामगिरीबद्दल प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील, उपसंचालक (व्यवस्थापन) ध्रुव विखे पाटील, आस्थापना अधिकारी विलास घुले, उपसुरक्षा अधिकारी बापूसाहेब उगले आणि सुरक्षा अधिकारी डी. व्ही. वाकचौरे यांनी सुरक्षा रक्षक व फायर टीमचे विशेष कौतुक करत त्यांना शाबासकी दिली.सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने परिसरातून त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!