सारथीच्या योजनांचा ग्रामीण भागातील लक्षित गटांपर्यंत विस्तार करावा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- राज्याचे जलसंपदा मंत्री व मराठा आरक्षण संदर्भात स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पुण्यात सारथी संस्थेला भेट देऊन योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामीण भागातील लक्षित गटांपर्यंत योजनांचा विस्तार करणे, युवकांना रोजगाराभिमुख योजना उपलब्ध करून देणे तसेच सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी नव्या संधी उपलब्ध करणे यावर त्यांनी विशेष भर दिला.

 संस्थेच्या विविध योजनांची सद्यस्थिती, अर्जदारांचा प्रतिसाद, ग्रामीण-शहरी भागातील गरजांनुसार आवश्यक बदल व नव्या उपक्रमांचा आराखडा यावर सविस्तर चर्चा झाली.

बैठकीपूर्वी आणि बैठकीदरम्यान विविध शिष्टमंडळांनी मंत्र्यांची भेट घेऊन आपली निवेदनं सादर केली. या निवेदनांमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व युवकांना अधिक प्रमाणात शिष्यवृत्ती, मार्गदर्शन केंद्रे, कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आणि रोजगार संधी मिळाव्यात, अशा मागण्या पुढे आल्या. मंत्री विखे पाटील यांनी प्रत्येक शिष्टमंडळाचे म्हणणे संयमाने ऐकून घेतले आणि त्यांच्या समस्या लक्षपूर्वक नोंदवल्या.

यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, “सामाजिकदृष्ट्या मागास घटकांच्या प्रगतीसाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना अधिकाधिक शैक्षणिक व व्यावसायिक संधी मिळायला हव्यात. रोजगाराभिमुख प्रशिक्षण, उच्च शिक्षणासाठी मदत, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन आणि आधुनिक कौशल्य विकास यावर संस्थेने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.”पुढील काळात ग्रामीण भागात संस्थेच्या शाखा किंवा समन्वय केंद्रे सुरू करण्याबाबतही सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या भेटीदरम्यान श्री. अजित निंबाळकर (भा.प्र.से. निवृत्त, माजी मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन व अध्यक्ष सारथी), श्री. महेश पाटील (भा.प्र.से., व्यवस्थापकीय संचालक, सारथी), श्री. उमाकांत दांगट (भा.प्र.से. निवृत्त, संचालक व कार्यकारिणी सदस्य), तसेच सारथीचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. 

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!