वाढदिवसाला सत्कार नको, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य द्या

बचत झालेल्या रकमेतून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्याचे आवाहन.

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी होणाऱ्या आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही सत्कार स्वीकारणार नसल्याचा निर्णय जलसंपदा तथा पालकमंत्री Radhakrishna Vikhe Patil यांनी जाहीर केला आहे. वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून तो गरजू विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याकरिता खर्च करावा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्ते, हितचिंतक आणि नागरिकांना केले आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मंत्री विखे पाटील म्हणाले की, वाढदिवसानिमित्त मिळणाऱ्या शुभेच्छा आणि सदिच्छा नेहमीच काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. नागरिकांच्या प्रेम व पाठबळामुळेच समाजहिताची कामे अधिक जोमाने करण्याची ऊर्जा मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यंदा वाढदिवसानिमित्त पुष्पहार, बुके, भेटवस्तू किंवा अन्य सत्कार स्वीकारला जाणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांनी फ्लेक्सबोर्ड, बॅनर आणि जाहिरातींवर होणारा खर्चही टाळावा, असे आवाहन केले. त्याऐवजी ही रक्कम समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, वह्या, दप्तरे आणि इतर शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी वापरावी, असे त्यांनी म्हटले आहे.

“आपल्या छोट्याशा मदतीमुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होऊ शकतो. वाढदिवस साजरा करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी योगदान देण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा,” असेही त्यांनी नमूद केले.

या सामाजिक उपक्रमासाठी वस्तूरूपाने योगदान देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी लोणी येथील Gangubai Vikhe Patil Indoor Stadium येथे सुरू करण्यात आलेल्या संकलन केंद्रात शालेय साहित्य जमा करावे. दि. १० जून ते १५ जून २०२६ या कालावधीत हे साहित्य स्वीकारले जाणार आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!