नगर दर्शन (वृत्तसेवा):- मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मध्ये नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घेतला आहे. अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या निर्णयातून झाली असल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनात मृत आंदोलकांच्या वारसदारांना शासकीय नोकरी देण्याची मागणी प्रमुख होती. या मागणीची दखल घेत सामान्य प्रशासन विभागाने शासन आदेश जारी केला असून, मृत आंदोलकांच्या पात्र वारसदारांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी उपोषण सोडताना मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मृत आंदोलकांच्या वारसदारांना एमआयडीसीमध्ये नोकरी देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनानुसार प्रशासनाने आवश्यक कार्यवाही पूर्ण केली आहे.
यापूर्वी मृत आंदोलकांच्या वारसदारांना राज्य परिवहन महामंडळात समाविष्ट करण्याचा विचार होता. मात्र, अनेक वारसदारांनी एमआयडीसी किंवा महावितरणमध्ये नोकरीची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मृत आंदोलकांच्या वारसदारांना नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली आहे.
या निर्णयानंतर सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून पात्र वारसदारांची अचूक पडताळणी करून त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहानिशा पूर्ण करून प्रमाणपत्र निर्गमित करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.






