नगर दर्शन (वृत्तसेवा):- राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा आवाज मॉर्फ करून बनावट ऑडिओ-व्हिडिओ तयार केल्याचा आणि तो समाजमाध्यमांवर प्रसारित करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी गणेश मारुती डेंगळे (रा. निमगाव जाळी, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश डेंगळे याने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह व दिशाभूल करणारी पोस्ट प्रसिद्ध केली होती. संबंधित पोस्टमध्ये मॉर्फ केलेला आवाज, बनावट ऑडिओ आणि व्हिडिओचा वापर करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा तसेच मंत्री विखे पाटील यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी लोणी बुद्रुक येथील अनिल नानासाहेब विखे यांनी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत संबंधित पोस्ट ही मंत्री विखे पाटील यांच्या चारित्र्यावर निराधार व तथ्यहीन आरोप करणारी असून, त्यामागे त्यांच्या राजकीय विरोधकांशी संगनमत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या पोस्टमुळे समर्थक आणि विरोधी गटांमध्ये तसेच समाजात द्वेषाची भावना निर्माण होऊन सामाजिक तेढ वाढण्याची शक्यता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीची दखल घेत लोणी पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती गणेश मारुती डेंगळे याच्याविरुद्ध २४ जुलै २०२६ रोजी गुन्हा क्रमांक ३६६/२०२६ दाखल केला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३३६(२), ३३६(३), ३३६(४), ३५३, ३५३(२), ३५६, ३५१ आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास लोणी पोलीस करीत आहेत.






