नगर दर्शन (वृत्तसेवा):- साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येत असतात. याच भाविकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुन्हा एकदा धडक कारवाई करत प्रसादासाठी विकल्या जाणाऱ्या पेढ्यांच्या विक्री केंद्रांवर धाडी टाकल्या. या कारवाईत तब्बल ६०० किलोहून अधिक पेढ्यांचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला, ज्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याची माहिती समोर आली आहे.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी शिर्डी परिसरातील विविध मिठाई व प्रसाद विक्री केंद्रांची तपासणी केली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन, मिठाईच्या दर्जाबाबत आढळलेल्या त्रुटी तसेच साठवणुकीतील अनियमितता निदर्शनास आल्या. त्यानंतर संबंधित पेढ्यांचा साठा जप्त करून नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे, आकर्षक पॅकिंग आणि “कलाकंद” या गोड नावाखाली विकल्या जाणाऱ्या मिठाईच्या गुणवत्तेबाबतही प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकारे भेसळयुक्त अथवा निकृष्ट दर्जाच्या मिठाईची विक्री करून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्यांवरही आगामी काळात कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
या संदर्भात बोलताना एफडीएच्या अधिकारी अपर्णा भोईटे यांनी सांगितले की, “भाविकांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकणाऱ्या सर्वांवर सातत्याने कारवाई सुरू राहील.”
शिर्डीमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात प्रसाद आणि मिठाईची विक्री होत असल्याने अन्न पदार्थांची गुणवत्ता कायम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एफडीएच्या या कारवाईमुळे मिठाई विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, ग्राहक आणि भाविकांनीही खाद्यपदार्थ खरेदी करताना अधिक जागरूक राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






