खोट्या फोनमुळे पोलिस यंत्रणा वेठीस; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

चोर आल्याची अफवा पसरवणे पडले महाग; लोणी पोलिसांत गुन्हा दाखल

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- भालेराव वाडी, हनुमंतगाव येथे चोरटे आल्याची खोटी माहिती देऊन पोलिस यंत्रणेला वेठीस धरणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पोलिसांचा वेळ व मनुष्यबळ वाया गेल्याने संबंधिताविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 217 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 10 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 2.31 वाजण्याच्या सुमारास लोणी पोलिस स्टेशनच्या एमडीटी (MDT) प्रणालीवर #CFS37292092 या क्रमांकाचा कॉल प्राप्त झाला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने भालेराव वाडी, हनुमंतगाव येथे चोरटे आल्याची घटना सुरू असून तातडीने पोलिस मदतीची आवश्यकता असल्याचे सांगितले.

या माहितीच्या आधारे लोणी पोलिस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. मात्र तेथे पोहोचल्यानंतर कोणतीही चोरी अथवा संशयास्पद घटना घडलेली नसल्याचे निदर्शनास आले. तसेच कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले.

तपासादरम्यान धनंजय हरिभाऊ अनाप (रा. भालेराव वाडी, हनुमंतगाव, ता. राहाता) यांनी कोणतीही घटना घडलेली नसताना पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल करून सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोहेकॉ. अमोल बाबाजी फटांगरे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी व बाबासाहेब सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. निलेश धादवड करीत आहेत.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!