नगर दर्शन (वृत्तसेवा):- जिद्द, दूरदृष्टी, संघटन कौशल्य, धडाडी आणि जनसेवेप्रती अखंड निष्ठा या गुणांचा संगम असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा दिली आहे. सामाजिक, राजकीय, कृषी, औद्योगिक आणि प्रशासकीय क्षेत्रात घेतलेल्या धाडसी व दूरगामी निर्णयांमुळे त्यांनी विकासाचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जनसेवा, सहकार आणि विकासाच्या परंपरेचा वारसा समर्थपणे पुढे नेताना डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केवळ शिर्डी मतदारसंघापुरतेच नव्हे, तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक वाढविणे, रोजगारनिर्मिती करणे आणि विकासाचे नवे केंद्र उभे करणे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
राज्याचे कृषिमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जवळून जाणून घेत कृषी क्षेत्रात अनेक पथदर्शी निर्णय घेतले. ट्रॅक्टर खरेदी, ठिबक सिंचन, विहीर, शेततळे, बियाणे किंवा खतांच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना अनेक कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. ही प्रशासकीय गुंतागुंत दूर करण्यासाठी त्यांनी ‘एक खिडकी योजना’ प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. या योजनेमुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचले तसेच शासनाच्या योजनांचा लाभ अधिक सुलभपणे मिळू लागला.
महसूल मंत्री म्हणून त्यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न सोडविला. सुमारे साडेसहा हजार एकर जमिनीचा वाद मार्गी लावत हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींचा कायदेशीर हक्क मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. याचबरोबर १९४७ च्या तुकडाबंदी कायद्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी कायद्यात सुधारणा करून १, २ आणि ३ गुंठ्यांच्या भूखंडांच्या व्यवहारांना नियमितीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मालमत्तेचे हक्क आणि आर्थिक व्यवहार सुलभ झाले.
सामाजिक प्रश्न हाताळताना त्यांनी नेहमीच संवाद आणि समन्वयाचा मार्ग स्वीकारला. मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे त्यांनी संवेदनशीलतेने पाहिले. अंतरवली सराटी येथे प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आणि शासनाची भूमिका संयमाने मांडली. आंदोलन दडपण्याऐवजी संवादातून मार्ग काढण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यास मदत झाली.
अहिल्यानगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव मिळवून देण्यातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. सर्व सामाजिक आणि राजकीय घटकांना विश्वासात घेऊन त्यांनी हा दीर्घकालीन प्रश्न यशस्वीपणे मार्गी लावला. त्यामुळे जिल्ह्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीचे नवे वैभव प्राप्त झाले.
आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाच्या विकासासाठी त्यांनी नेवासा येथे ‘संत ज्ञानेश्वर सृष्टी’ या जागतिक दर्जाच्या प्रकल्पाची संकल्पना पुढे आणली. सुमारे ८०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प काशी विश्वनाथ आणि उज्जैन कॉरिडोरच्या धर्तीवर विकसित होणार असून संत ज्ञानेश्वरांच्या कार्याचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करण्यास तो महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
औद्योगिक विकासाच्या क्षेत्रातही त्यांनी दूरदृष्टी दाखविली आहे. शिर्डी एमआयडीसी अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या ‘डिफेन्स क्लस्टर’ प्रकल्पामुळे क्षेपणास्त्र, ड्रोन आणि दारूगोळा निर्मितीसारखे अत्याधुनिक उद्योग जिल्ह्यात येत आहेत. हजारो कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे उभा राहत आहे.
शेती, पाणी, वीज, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास असलेले नेतृत्व म्हणून डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची ओळख आहे. सर्वसामान्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. त्यामुळेच आजही त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. विकासकामांचा वेग, प्रशासकीय कार्यक्षमता आणि जनतेशी असलेला थेट संवाद यामुळे त्यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघ विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून उभा केला आहे.
अहिल्यानगरच्या सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि औद्योगिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील हे खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या औद्योगिक आणि सामाजिक क्रांतीचे शिल्पकार ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा हा प्रवास भविष्यातही अधिक वेगाने सुरू राहील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
– डॉ. राजेंद्र विखे पाटील
कुलपती, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (अभिमत विद्यापीठ), प्रवरानगर







