प्रवरानगर येथे २२ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विविध योजनांचे वितरण

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- राज्य शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभांचे व प्रमाणपत्रांचे वितरण होणार असल्याची माहिती शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल विभागामार्फत २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत राज्यभरातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका दिवशी विशेष महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ या शिबिरातून देण्यात येणार आहे. कार्यक्रमास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

प्रवरानगर येथील शिबिरासाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून महसूल, कृषी, आरोग्य, कौशल्य विकास, महिला बचत गट आदी विभागांच्या योजनांतील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, साहित्य व विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात येणार आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!