विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत नेतृत्वगुण आणि छंद जोपासावेत : पोलीस निरीक्षक युवराज आठरे

प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी पदाधिकारी पदग्रहण समारंभ उत्साहात

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित न करता आपल्या आवडीचे छंद जोपासावेत. शालेय जीवनात मिळणाऱ्या विविध संधींमुळे नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि कौशल्याला योग्य दिशा मिळते. नियमांचे पालन करून आदर्श नागरिक बनण्याचा संकल्प करावा. प्रवरेचे संस्कार हे जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक घडविणारे असून सहकाराच्या पवित्र भूमीत शिक्षण घेत असल्याचा प्रत्येक विद्यार्थ्याने अभिमान बाळगावा, असे प्रतिपादन लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी केले.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी आयोजित विद्यार्थी पदाधिकारी पदग्रहण (Prefect Investiture) समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुख्य क्रीडा विद्यार्थी प्रतिनिधी संचित चंदन (स्पोर्ट्स प्रिफेक्ट), मुख्य क्रीडा विद्यार्थिनी, हाऊस प्रिफेक्ट, सांस्कृतिक प्रिफेक्ट तसेच विविध विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना बॅज व सॅश प्रदान करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे यांनी नवनियुक्त विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना शाळेची शिस्त, प्रामाणिकपणा, नेतृत्व, सेवाभाव आणि जबाबदारी यांचे प्रामाणिकपणे पालन करण्याची शपथ दिली.

मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक आठरे म्हणाले की, प्रवरेसारख्या संस्थेत शिक्षण घेण्याचे भाग्य प्रत्येकाला लाभत नाही. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात घडलेले परिवर्तन प्रेरणादायी असून संस्थेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत उत्तम संस्कारही दिले जातात. शालेय जीवनात मिळणाऱ्या नेतृत्वाच्या संधी भविष्यातील यशाचा पाया घालतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने या संधींचे सोने करत स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे.

ते पुढे म्हणाले की, आज सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्याचा गैरवापर टाळून माहितीचे आदान-प्रदान, ज्ञानवृद्धी आणि स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी मोबाईल व सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करावा. शिस्त, जबाबदारी आणि सेवाभाव या मूल्यांच्या आधारेच यशस्वी आयुष्य घडते.

समारंभात विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वागतगीत, मार्चपास्ट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदांत विखे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. जगधने, प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ. रत्नपारखी, वस्तीगृह प्रमुख दिपक जाधव, शारीरिक शिक्षण संचालक अफजल पटेल तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!