नगर दर्शन (वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांविरोधात नागरिकांचा संताप आता रस्त्यावर उतरला आहे. हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या भरदुपारी झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ शहरात गेल्या चार दिवसांपासून बेमुदत बंद पाळण्यात येत असून, या आंदोलनाला व्यापारी, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शनिवारी भरदुपारी तीन ते चार हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून आकाश दुबैया यांची निर्घृण हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीती, संताप आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.
श्रीरामपूर शहरात अवघ्या अकरा दिवसांत चार गंभीर आणि प्राणघातक गुन्ह्यांच्या घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीयांच्या वतीने श्रीरामपूर शहरात भव्य विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हनुमान मंदिर परिसरातून मोर्चाला प्रारंभ झाला असून, शहरातील व्यापारी, विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि हजारो नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले आहेत.
हा मोर्चा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यावर धडकणार असून, आरोपींवर कठोर व तातडीने कारवाई करणे, वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आणणे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे आणि शहरात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणे, या प्रमुख मागण्या आंदोलकांनी प्रशासनाकडे मांडल्या आहेत.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.






