नगर दर्शन (वृत्तसेवा):- सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं सोमवारी रात्री निधन झालं. वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सर्वोच्च न्यायालयात चक्कर आल्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सिद्धार्थ शिंदे यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मूळचे नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरचे ते रहिवासी होते. सिद्धार्थ हे माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते.
गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धार्थ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम करत होते. महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीतीच उत्तम समज, संविधानाचे सखोल ज्ञान असलेला विधीज्ञ अशी त्यांची ओळख होती. वयाच्या अवघ्या ४८व्या वर्षी आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आलीय. त्यांचे पार्थिव नवी दिल्लीहून मंगळवारी १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी पुण्यातील त्यांच्या घरी आणण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता वैकुंठ स्मशान भूमी, रविवार पेठ, पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सिद्धार्थ शिंदे सोमवारी नेहमीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात कामकाजानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांना अचानक चक्कर आली. यानंतर सिद्धार्थ यांना एम्स रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर हे त्यांचं मूळ गाव. गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धार्थ शिंदे यांचं कुटुंबिय पुण्यात वास्तव्यास आहे. खटले, महत्वाचे निर्णय, कायद्याबाबत अत्यंत सोप्या भाषेत विश्लेषण करण्यात त्यांचा हातखंडा होता. सोप्या पद्धतीने विश्लेषण करणारे संविधान विश्लेषक गमावल्याची भावना वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केलीय.
