नगर दर्शन (वृत्तसेवा):- केंद्र आणि राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे दामदुप्पट योजनेच्या नावाखाली जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणा-या कंपन्यावर कारवाई सुरु झाली आहे. सामान्य माणसाचे पैसे घेवून त्यांची फसवणूक करणा-यावर कारवाई तर होणार आहेच, परंतू अशा घटना टाळायच्या असतील तर सहकारी बॅकांना अधिक विश्वासाने वाटचाल करावी लागेल. सहकारी बॅकांमधील ठेवींना विम्याचे संरक्षण आहे परंतू अधिकचे संरक्षण ठेवीदारांना कसे देता येईल याचा विचार सहकारी बॅकांनी करावा असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

प्रवरा सहकारी बॅकेची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन डॉ.भास्करराव खर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेस माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, पद्मश्री डॉ.विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील, व्हा.चेअरमन सोपान शिरसाठ, बॅकेचे व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे, ट्रक्स वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदकिशोर राठी, कैलास तांबे यांच्यासह बॅकेचे सर्व संचालक आणि सभासद उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, ५० वर्षांच्या सर्व यशस्वी प्रवासात प्रवरा सहकारी बॅकेने ८४५ कोटी रुपयांच्या ठवींचे उदिष्ठ पुर्ण करुन, १५०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. सहकारी बॅकींग क्षेत्राच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब असून, सभासद आणि ठेवीदारांचा विश्वास संपादन करुन, अतिशय शिस्तीने केलेल्या कारभाराचे हे यश असून, येणा-या काळात बॅक १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचे उदिष्ठ पुर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहकारी बॅकांवरील ग्राहकांचा विश्वास हा वाढत आहे. कारण छोट्या कंपन्या येवून सामान्य माणसाची फसवणूक करीत आहेत. दामदुप्पट पैसे करुन देण्याच्या अमिषाला बळी पडून जिल्ह्यातील अनेक नागरीकांचे कोट्यावधी रुपये आज बुडाले आहेत. पारनेर मधील सीस्पे, शिर्डी मधील ग्रोमोअर तसेच शेवगाव, श्रीगोंद्यामध्ये या कंपन्यांनी कोट्यावधी रुपये गोळा केले.
या कंपन्यावर कारवाईचे आदेश दिलेले आहेतच असा इशारा देवून मंत्री विखे पाटील म्हणाले की, ग्राहकांची विश्वासार्हता मिळवायची असेल तर, सहकारी बॅकांना ग्राहकांना हमी द्यावी लागेल. सध्या ठेवींना ५ लाखांचे संरक्षण आहेच, पण ठेवींना अधिकच्या संरक्षणाची हमी देता येईल का याचाही विचार बॅकांनी करण्याची गरज मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.
प्रवरा सहकारी बॅक नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन सुविधा देण्यास सज्ज होईल असे सांगून, बदलते तंत्रज्ञान आत्मसात करुनच आता ग्राहकांना सुविधा द्याव्या लागणार आहेत. जिल्ह्यामध्ये अनेक चांगले उद्योग येत असून, या उद्योगांना सहकारी बॅकांमधून चांगले अर्थसहाय्य झाल्यास शिर्डी औद्योगिक वसाहतीत उद्योग उभे राहतील. अहिल्यानगर जिल्ह्यात आता संरक्षण सामुग्री उत्पादीत करणारे क्लस्टर निर्माण होत असून, यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. टाटा कंपनीच्या सहकार्याने ट्रेनिंग सेंटर उभारले जाणार असून, हा पहिला प्रकल्प ठरेल.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी देशाला प्रथमच राष्ट्रीय सहकार धोरण लागू केले. या धोरणाचा बॅकींग क्षेत्राला कसा फायदा होईल याचा विचार सहकारी बॅकांनी करावा. यापुर्वी बॅकींग क्षेत्राबाबत नेहमीच असुया बाळगली गेली. मात्र सहकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून केंद्र सरकारचे मोठे सहकार्य सहकारी बॅकींग क्षेत्राला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी बॅकेंने केलेल्या प्रगतीचे कौतूक करुन, आपल्या सर्व संस्था या अधिक सुदृढ कशा होतील असा प्रत्यन करण्याचे आवाहन करुन, इतर ठिकाणची परिस्थिती पाहीली तर आपल्या भागामध्ये असलेले वातावरण ही केवळ पुर्वीच्या पुण्याईमुळे आहे. सहकार चळवळीमुळेच सामाजिक शांतता आपल्याला पाहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
चेअरमन डॉ.भास्करराव खर्डे पाटील यांनी बॅकेंने केलेल्या वाटचालीचा आढावा घेवून यावर्षी शेतक-यांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा केली. व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे यांनी मंत्री विखे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व सत्कार सोहळे रद्द करण्यात आले.







