जामखेडचे पाणी कुठेही कमी होऊ देणार नाही – ना. राधाकृष्ण विखे पाटील

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- “तालुक्याचे पाणी कुठेही कमी होणार नाही, त्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. जामखेडच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे,” अशी ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. प्रांजली चिंतामणी यांच्या निवासस्थानी भेट देत मंत्री विखे पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी विजयी झालेल्या सर्व नगरसेवकांचा सन्मान करून त्यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, भाजपाचे अध्यक्ष नितीन दिनकर, मनोज कुलकर्णी, विनायक देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपालिका निवडणुकीत सौ. प्रांजली चिंतामणी यांचा झालेला विजय हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी आनंददायी असल्याची प्रतिक्रिया मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप महायुतीला जनतेने मोठे पाठबळ दिले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरल्याचे त्यांनी सांगितले. जामखेड नगरपालिकेत नगराध्यक्षा आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी मिळवलेला विजय ऐतिहासिक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आमदार सुरेश धस यांच्या पाणी योजनेमुळे जामखेड शहर व तालुक्याला पुरेसा पाणीपुरवठा होणार असून, जनतेवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या माध्यमातून जामखेडच्या विकासाला आणि पाणी प्रश्नाच्या कायमस्वरूपी समाधानाला बळ मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!