नगर दर्शन (वृत्तसेवा):- नेवासा तालुक्यातील घोडगाव येथे दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेला भीषण वळण लागले असून गंभीर जखमी झालेल्या नितीन शिरसाठ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये झालेल्या वादातून गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी नितीन शिरसाठ यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेर त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला. संभाव्य तणाव टाळण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संबंधित आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे घोडगाव व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






