नगर दर्शन (वृत्तसेवा):- निमगावजाळी शिवारात शुक्रवारी दुपारी दोन चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघे जण जखमी झाले आहेत. सुदैवाने दोन्ही वाहनांतील एअरबॅग्स वेळेवर उघडल्याने मोठा अनर्थ टळला.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ३:३० वाजता लोणीकडून संगमनेरच्या दिशेने जाणारी इनोव्हा क्रिस्टा (एम.एच. १७ डीसी ६५६५) आणि संगमनेरकडून लोणीच्या दिशेने येणारी स्विफ्ट (एम.एच. १७ सीएक्स ५९२७) यांच्यात हॉटेल न्यू तरंग नजीक जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या अपघातात लोणी येथील हॉटेल व्यावसायिक गणपत भोसले यांच्यासह संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील श्री. रहाटळ आणि त्यांच्यासमवेत असलेला आणखी एक जण असे तिघे जण जखमी झाले आहेत. गणपत भोसले यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. तर उर्वरित दोघांना पुढील उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून मदतकार्य केले. स्थानिकांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले.






