नगर दर्शन (वृत्तसेवा):- नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील गोंडेगाव परिसरातील शेतकऱ्यांची स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. शेतातील पिकांचे नुकसान आणि शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची वारंवार चोरी होत असतानाही पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन दिले आहे.
नेमकी घटना काय?
गोंडेगाव येथील गट क्रमांक १५१ मधील जमीनमालक नामदेव दला जाधव आणि पुण्याबाई नामदेव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मालकीच्या शेतात सामाईक विहिरीजवळ ठेवलेली शेतीची अवजारे, लोखंडी अँगल तसेच इतर साहित्याची वारंवार चोरी होत आहे. या चोरीप्रकरणामागे बाळकृष्ण काशिनाथ दाते या व्यक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
पोलिसांवर गंभीर आरोप
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेबाबत सायखेडा येथील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात आले आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक असतानाही त्यांच्याशी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.याशिवाय संशयित आरोपी हा पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा नातेवाईक असल्यानेच त्याला संरक्षण दिले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या चोरीच्या घटनांमध्ये काही पोलिसांचे साटेलोटे असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
२४ तासांत चौकशीची मागणी
स्थानिक पोलिसांवरील विश्वास कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाची २४ तासांच्या आत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जाण्याचा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे.
दरम्यान, या गंभीर आरोपांनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणात काय भूमिका घेतात आणि संबंधितांवर कोणती कारवाई होते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.







