नगर दर्शन :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लोणी बुद्रूक येथे सुरू करण्यात आलेले भाजीपाला लिलाव केंद्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला.
लोणी बुद्रूक येथील बाजारतळावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून भाजीपाला होलसेल विक्री व्यवस्थेची नवी सुविधा सुरू करण्यात आली. या केंद्राचा औपचारिक शुभारंभ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती आण्णासाहेब कडू, संचालक राहुल धावणे, संतोष गोर्डे, दत्तात्रय गोर्डे, प्रभारी सरपंच श्रीमती कल्पना मैड, भाऊसाहेब तुकाराम विखे, दिलीप विखे, प्रविण विखे, एन.डी. विखे, तसेच सचिव सुभाष मोठे आणि अनेक शेतकरी उपस्थित होते.
राहाता बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पारदर्शक कारभार आणि शेतकरी हिताच्या निर्णयांमुळे या समितीला केवळ अहील्यानगर जिल्ह्यातच नव्हे, तर इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भाजीपाला होलसेल केंद्राची गरज ओळखून ती पूर्ण केल्याबद्दल पदाधिकारी व संचालक मंडळाचे शालिनीताई विखे पाटील यांनी अभिनंदन केले.
लोणी बुद्रूक येथील नव्याने सुरू झालेले हे केंद्र भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच परिसरातील गावांसाठी मध्यवर्ती ठरणार आहे. सकाळी उत्पादित माल थेट होलसेल दरात विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना दूरवर जाण्याची गरज भासणार नाही. बाजारतळावर उभारण्यात आलेले मोठे शेड आणि विस्तीर्ण परिसर यामुळे व्यवहार सुलभ होणार असून, शेतकऱ्यांना या केंद्राचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.







