दाढ बुद्रुक येथे पैशांच्या वादातून मारहाण सात जणांविरोधात लोणी पोलिसांत गुन्हा दाखल

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- दाढ बुद्रुक येथील दिवेवस्ती परिसरात उसने दिलेल्या पैशांच्या मागणीवरून दोन गटांमध्ये वाद होऊन मारहाण, दगडफेक व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणी पोलीस स्टेशन येथे सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी रशीद कादर इनामदार (वय ४८, रा. दिवेवस्ती दाढ बुद्रुक, ता. राहाता) यांनी शेजारी राहणारे अखीलेश सोपान दिवे यांना दिवाळीच्या काळात लग्नाच्या कारणासाठी सुमारे तीन लाख रुपये उसने दिले होते. संबंधित रक्कम अमतवाहिनी पतसंस्था, आश्वी बुद्रुक येथून कर्ज काढून देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी पैसे परत मागितले असता “सध्या पैसे देण्याची ऐपत नाही” असे सांगण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, बुधवारी (दि. ६ मे) दुपारी साडेदोन वाजण्याच्या सुमारास नाना फाटा, दाढ बुद्रुक शिवार येथे फिर्यादींचा पुतण्या ताबेश जमीर इनामदार हा मोटारसायकलवरून शेतात चारा आणण्यासाठी जात असताना गौरव टपळे याने “मोटारसायकलचा कट मारला” या कारणावरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अखीलेश दिवे, प्रतीक दिवे, वैशाली दिवे, मयूर दिवे, सुमीत साळवे, निरंजन पाळंदे व प्रेम पाळंदे हे सर्वजण फिर्यादींच्या घरी आले. “सध्या आमच्याकडे पैसे नाहीत, वारंवार पैशांची मागणी करू नका” असे म्हणत शिवीगाळ केल्याचा तसेच धक्काबुक्की करून दगडफेक केल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे. या दगडफेकीत फिर्यादी व त्यांच्या भावजयी परवीन इनामदार यांना दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करून वाद सोडविला. या प्रकरणी लोणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक सुखदेव खेमनार करीत आहेत.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!