साई दर्शनासाठी आलेल्या पश्चिम बंगालच्या तरुणीला खोलीत ओढून विनयभंग

शिर्डीतील साई भक्तनिवासात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या पश्चिम बंगालमधील २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी राहाता तालुक्यातील एका युवकाविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ जून रोजी श्री साईबाबा संस्थानच्या भक्तनिवास परिसरात घडली असून १२ जून रोजी याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्जला विद्यार्थी भगत (वय २०, रा. साकरेल, जि. हावडा, पश्चिम बंगाल) ही आपल्या आई-वडील व बहिणीसह साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आली होती. कुटुंबीयांनी संस्थानच्या भक्तनिवासातील सी बिल्डिंगमधील रूम क्रमांक २१९ मध्ये मुक्काम केला होता.

५ जून रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची आई, वडील व बहीण दर्शनासाठी गेले असताना ती एकटीच खोलीत होती. यावेळी बेल वाजल्याने तिने दरवाजा उघडला असता एक अनोळखी युवक तिच्यासमोर उभा होता. त्याने बोलण्याच्या बहाण्याने तिला जवळील रूम क्रमांक २०४ समोर बोलावले.

फिर्यादी त्या ठिकाणी गेल्यानंतर संबंधित युवकाने तिचा हात धरून जबरदस्तीने खोलीत ओढले. तसेच तिच्या छातीस स्पर्श करून ओठांवर चुंबन घेत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर स्वतःचे नाव अमन पठाण असल्याचे सांगत मोबाईल क्रमांक घेण्याचा आग्रह केला. घाबरलेल्या तरुणीने आरडाओरडा करत तेथून स्वतःची सुटका करून घेतली व आपल्या खोलीत परतली.

घटनेनंतर भीतीपोटी तिने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला नव्हता. मात्र १२ जून रोजी तिने आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संबंधित युवकाला बोलावून विचारणा केली असता त्याने उद्धटपणे उत्तर देत तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी अमन पठाण (रा. वाळकी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ७४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल दिनकर चव्हाण करीत आहेत.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!