भाविक तरुणी विनयभंग प्रकरणावरून शिर्डीत संताप; कठोर कारवाईची मागणी

५०० रूम्स प्रकरण गाजले; संस्थान प्रशासनाकडे निवेदन

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या ५०० रूम्स भक्तनिवासात घडलेल्या भाविक तरुणीच्या विनयभंग प्रकरणानंतर संतापाची लाट उसळली असून, संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे. या संदर्भात “साईबाबा भक्त परिवार, शिर्डी” यांच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम बंगाल येथून साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या एका कुटुंबातील तरुणीसोबत संस्थानच्या ५०० रूम्स भक्तनिवास परिसरात गैरवर्तन झाल्याचा आरोप असून, या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिर्डीत येणाऱ्या महिला भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

निवेदनात आरोपी अमन पठाण याला तात्काळ सेवेतून कमी करून संस्थानच्या सर्व कामांमधून कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच तो ज्या कंत्राटी एजन्सीमार्फत कार्यरत होता, त्या एजन्सीच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय साईबाबा मंदिर परिसर, संस्थानची विविध भक्तनिवास व्यवस्था आणि संपूर्ण शिर्डी शहर परिसरात महिला व भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवास व्यवस्था परिसरातील सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेची तपासणी करून आवश्यक सुधारणा करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, मंदिर व भक्तनिवास परिसरात २४ तास कडक सुरक्षा व्यवस्था, नियमित गस्त आणि सीसीटीव्ही देखरेख वाढविण्यात यावी. तसेच पीडित कुटुंबाला आवश्यक कायदेशीर व मानसिक मदत उपलब्ध करून देण्यात यावी.

दरम्यान, या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल असून, पुढील तपास सुरू आहे. निवेदनकर्त्यांनी प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही दिला आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!