सादतपूर गावात चोरांचा धुमाकूळ; मंदिरांसह शाळा आणि सरकारी संस्थांना लक्ष्य

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- काल रात्री अज्ञात चोरट्यांनी सादतपूर गावात अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री मंदिर, शाळा, ग्रामपंचायत आणि सोसायटी अशा पाच ते सहा ठिकाणी धाडसी चोऱ्या केल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी गावातील श्रद्धास्थान असलेल्या सादेश्वर मंदिराला टार्गेट केले. मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दानपेटी फोडून त्यातील सर्व रोख रक्कम लंपास केली आहे. इतकेच नाही तर मारुती मंदिरातही चोरीचा प्रयत्न झाला असून तिथेही साहित्याची उचकापाचक करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनासाठी वापरली जाणारी जिल्हा परिषद शाळेतील गॅस टाकी देखील चोरट्यांनी चोरून नेली आहे. यामुळे शाळेच्या पोषण आहार योजनेवर परिणाम झाला आहे. चोरट्यांनी केवळ मंदिरेच नव्हे, तर गावातील प्रशासकीय आणि आर्थिक संस्थांनाही सोडले नाही.ग्रामपंचायत कार्यालय,विविध कार्यकारी सेवा सोसायटी या दोन्ही ठिकाणी चोरांनी कुलूप तोडून चोरी केली आहे. महत्त्वाचे कागदपत्रे आणि कपाटांची मोडतोड करण्यात आली.

एकाच रात्री पाच-सहा ठिकाणी झालेल्या या चोऱ्यांमुळे सादतपूर ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. “गावात रात्रीची गस्त वाढवण्यात यावी आणि या सराईत गुन्हेगारांचा तात्काळ बंदोबस्त करावा,” अशी मागणी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात येणार असल्याचे समजते.या चोरीत नेमकी किती रुपयांची लूट झाली आहे, याचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही. मात्र, या घटनेने सादतपूर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!