सभापती राम शिंदे यांच्याकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

SHARE:

नगर दर्शन ( वृत्तसेवा):- अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कर्जत तालुक्यातील नागलवाडी, नागपूर आणि सितपूर या गावांना भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या आणि नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधा गंभीरपणे बाधित झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर महसूल, कृषी व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसांत पंचनामे करून त्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, प्रभावित कुटुंबांना अन्न, पाणी व वैद्यकीय मदत मिळावी आणि गावांतील दळणवळण सुरळीत व्हावे, यासाठी तातडीची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

ग्रामस्थांना संबोधित करताना स्पष्ट केले की, “ही आपत्ती तुम्हाला एकट्याने लढायची नाही. शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. एकही ग्रामस्थ किंवा शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. मी स्वतः हा संपूर्ण विषय शासन स्तरावर पाठपुरावा करून आवश्यक ती मदत निश्चितपणे मिळवून देईन.”

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी श्री. नितीन पाटील यांच्यासह महसूल, कृषी, वन व जलसंधारण विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच कर्जत तालुक्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ग्रामस्थांनी संयम राखावा, एकमेकांना सहकार्य करावे आणि प्रशासनाशी समन्वय ठेवून परिस्थितीचा सामना करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!