मिलिंद नार्वेकर मला फोन करुन म्हणाले, उद्धवजी खूप नर्व्हस आहे, देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- भारतीय जनता पक्षाचा विजय संकल्प मेळावा आज मुंबईत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी याआधी घडलेल्या घडामोडींबाबत अनेक गौप्यस्फोट केले. त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका देखील केली.

“मागच्या मुंबई महापालिका निवडणुकीत थोडक्याने राहिलो होतो. दोनच कमी पडले होते. पण तुम्हाला माहिती आहे, कमी असले तरी काय करायचं ते आपल्याला माहित असल्यामुळे आपण गणित जमवलं होतं आणि भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर बसायची वेळ त्यावेळी आली होती. पण मला आजही आठवतं की, मला फोन आला. एकनाथ शिंदे जे आपले सहकारी आहेत आणि मिलिंद नार्वेकर यांचा फोन आला”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“मिलिंद नार्वेकर मला म्हणाले, आपली महायुती आहे. ठिक आहे, तुमचा महापौर बनू शकतो. पण इतके वर्ष आमचा महापौर बनतोय. उद्धवजींची इच्छा आहे की, आपला महापौर झाला पाहिजे, उद्धवजी खूप नर्व्हस झाले आहेत, नाराज झाले आहेत, त्यामुळे आमची विनंती आहे की, तुम्ही शिवसेनेला महापौर द्या”, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“आपण क्षणाचाही विलंब लावला नाही. माझ्या सर्व सहकाऱ्यांना बोलावलं, त्यांना विचारलं की, काय करायला पाहिजे. सगळ्यांनी सांगितलं की, ठिक आहे, तुम्हाला वाटत असेल तर आपण एक पाऊल मागे घेऊ आणि पुन्हा एकदा महापौर पद देऊ. आम्ही ठरवलं की, महापौर तुम्ही घ्या, उपमहापौरही तुम्ही घ्या आणि स्थायी समितीचं अध्यक्षही तुम्ही घ्या. आम्ही या महापालिकेत अंकुश म्हणून काम करु. विरोधी पक्ष म्हणून काम करणार नाहीत. पण तुम्ही कुठे चुकलात तर तुम्हाला लायनीवर आणण्याचं काम आम्ही करु आणि आपल्या हाती असलेला महापौर आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देऊन टाकला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“आपण तर मन मोठं करुन दाखवलं. आपल्याला वाटलं की, मित्राकरता कधी बलिदानही द्यावं लागतं. ते आपण केलं. पण 2019 आल्यानंतर विधानसभेची निवडणूक आली आणि त्यानंतर मला गाणं म्हणावं लागलं की, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का यार ने ही लूट लिया घर यार का”, अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!