ahilyanagar news (लेख:- पत्रकार संजय कोळसे) : कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थांचे जागृत देवस्थान, आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साडेतीन शक्तीपीठांचे वसतीस्थान भगवतीदेवीच्या नवरात्रौत्सवास हर्षोल्हासात रूढी-परंपरानुरूप विधिवत आज सोमवार २२ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. काकड आरती, सांज आरती व इतर धार्मिक विधी परंपरेनुसार होणार आहेत. भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे याकरिता दर्शनबारीची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरात नऊ दिवस वास्तव्यास राहून उपवास करणाऱ्या अर्थात घटी बसणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. परगावाहून येणाऱ्या देवीच्या ज्योती, स्थानिक तळीचा व माळेचा कार्यक्रम, खेळणी, प्रसादालय, खाद्यपदार्थ, पूजा साहित्य व इतर दुकाने, विजयादशमी दसरा सामुहिक सीमोल्लंघन या सर्व बाबी प्रतिवर्षीप्रमाणे आहे. कोल्हार भगवतीपूरची भगवतीमाता, तुळजापूरची तुळजा भवानीमाता, माहूरची रेणुकामाता, वणीची सप्तशृंगीमाता यांचा अलौकिक संगम असलेल्या या पवित्र शक्तिपीठांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, भगवतीमाता नवसाला पावते अशी तिची ख्याती आहे.
नवरात्र महोत्सव- या ठिकाणी घटस्थापना ते विजयादशमी पर्यंत रूढी परंपरेनुसार व भक्तिभावाने चालणाऱ्या नवरात्र महोत्सवाचा प्रारंभ सकाळी ८ वाजता ग्रामस्थांच्यावतीने अभिषेकाने होतो. त्यानंतर सिंदूरलेपन, अलंकरण, घटस्थापना व महाआरती होते. देवी मूर्तीच्या मागील चांदीची रेखीव मखर व फुलांनी केलेले सुशोभीकरण मनमोहक ठरत असते. नवरात्र काळात दररोज पहाटे ५:१५ वाजता काकड आरती व सायंकाळी ७:१५ वाजता महाआरती होते. येथे देवीमहात्म्य पारायण, दुर्गा सप्तशती पाठ तसेच भजन कीर्तन आदी कार्यक्रम होतात. नऊ दिवस उपवास करणारे, घट बसणारे महिला-पुरुष भाविक मंदिरातच वास्तव्य करतात. दरवर्षी नवरात्रोत्सव काळात विविधांगी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अष्टमीस नवचंडीयज्ञास प्रारंभ होतो तर नवमीस पूर्णाहुती दिली जाते. मंदिरात तसेच सभोवताली व प्रमुख रस्त्यांवर केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे परिसर झगमगटून जातो.
आख्यायिका – पूर्वाभिमुख असलेले येथील भगवती मातेचे मंदिर हेमांडपंथी बांधकामाचे आहे. मंदिर पुरातन काळात उभारले गेले असून जिर्णोद्धाराच्या वेळी जमिनीमध्ये सुमारे ५० ते ६० फुट खोलवर खोदकाम करूनही मंदिराचा पाया सापडला नव्हता. तथा शिलालेखसदृश्य अन्य पुरावा मिळाला नाही. त्यामुळे मंदिराच्या स्थापनेचा निश्चित काळ सांगता येत नाही. संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदारांच्या जहागिरीतील कोल्हार भगवतीपुर हे
गाव होते. आळंदी येथील एका ग्रंथात ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासा ते आळंदी प्रवासात या मंदिरात मुक्काम केल्याचा उल्लेख आहे. या जुन्या कोल्हाळेश्वर महादेव मंदिरातील मोठ्या नंदीच्या पाठीमागील बाजूकडून ते थेट भगवती मंदिराच्या पाठीमागे पोहीपर्यंत पूर्वीच्या काळी जमिनीखालून भुयार असल्याचे सांगितले जाते. ते भुयार आता सापडत नाही. या व्यतिरिक्त अनेक आख्यायिका व मंदिर स्थापनेविषयी अनुमान सांगितले जातात. भगवतीदेवीचे मंदिर शेकडो वर्षांपूर्वी उभारले गेले.
याशिवाय ट्रस्टअंतर्गत विठ्ठल रुक्मिणी मंदिर व मारुती मंदिराचे जीर्णोद्धार कार्य पूर्ण झाले. येथील पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या कोल्हाळेश्वर महादेव मंदिराचे निर्माणकार्य झाले. याशिवाय गावातील हनुमान मंदिर, महालक्ष्मी मंदिर आदि मंदिरांचा जीर्णोद्धार झाला. देवीच्या मंदिरातील भव्य सभामंडप, ग्रेनाईट फरशीचे काम, दीपमाळेपुढील आकर्षक व भव्य व्यासपीठ, मंदिराच्या सभामंडपाच्या कमानी, मंदिरातील आकर्षक व रेखीव नक्षीकाम, भक्तनिवास, रंगरंगोटी या सर्व गोष्टींमुळे मंदिराच्या सौंदर्यात भरच पडली आहे. मंदिराच्या भव्य प्रांगणात बसविलेल्या पेव्हिंग ब्लॉकमुळे तसेच वृक्षारोपणामुळे परिसर सुशोभित झाला आहे. भगवतीदेवी मंदिराला खेटून भव्य सभामंडप उभारणीचे कार्य सुरु आहे. प्रसन्न व आकर्षक परिसर निर्मिती झाल्यामुळे भाविकांमध्ये समाधान आहे.







