नगर दर्शन (वृत्तसेवा):- लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील चंद्रपूर गावाजवळील साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पायरेन्स IBMA कॉलेजच्या MBA द्वितीय वर्षातील तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून महाविद्यालयीन विद्यार्थी व पालकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पायरेन्स IBMA कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे अभिषेक गंगाधर जाधव (वय २४, रा. सुरेगाव शिंगणापूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), प्रवीण प्रभाकर रसाळ (वय २३, रा. रामनगर, छत्रपती संभाजीनगर) आणि महेश अशोक शिंदे (वय २६, रा. संत ज्ञानेश्वर नगर, छत्रपती संभाजीनगर) हे तिघे मित्र चंद्रपूर गावातील साठवण तलाव परिसरात गेले होते. उष्णतेमुळे त्यांनी तलावात पोहण्यासाठी प्रवेश केला. मात्र पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य करण्यात आले, मात्र तिघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून पुढील प्रक्रिया करण्यात आली.या प्रकरणी लोणी पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
लोणी पोलीस स्टेशनचे API युवराज आठरे यांनी घटनेची माहिती दिली.एकाच वेळी तीन तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महाविद्यालय परिसरात शोक व्यक्त करण्यात येत असून मित्रपरिवारातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.






