नगर दर्शन (वृत्तसेवा):- “मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून सकारात्मक कार्यवाही सुरू असून, शुक्रवार दि. २९ मे रोजी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सरकारकडून सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती देणार असून, त्यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती करणार आहे,” अशी माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शिर्डी येथे माध्यमांशी संवाद साधताना ना. विखे पाटील म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत सकारात्मक आहेत. २०१४ ते २०१९ या कालावधीत मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले होते. समाजबांधवांनी शांततेत आणि प्रामाणिक भावनेतून मोर्चे काढले होते. त्या भावना लक्षात घेऊन सरकारने कार्यवाही केली होती. मात्र, मधल्या काळात महाविकास आघाडी सरकारला हे आरक्षण टिकवता आले नाही, असा आरोपही त्यांनी केला.ते पुढे म्हणाले की, “महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर मराठा आरक्षणासाठी प्रयत्नांना वेग देण्यात आला आहे. जरांगे पाटलांच्या मागणीनुसार सरकारने हैदराबाद गॅझेट जाहीर केले असून, अनेक मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत.”
आरक्षणाच्या संदर्भात अनेक कायदेशीर लढाया यापूर्वी झाल्या असून, कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. याआधीही त्यांनीच समाजाला आरक्षण दिले आणि आताही तेच देणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच आरक्षणाच्या मागणीवर मार्ग निघत आहे,” असे विखे पाटील म्हणाले.
उपोषण हा एकमेव मार्ग नसल्याचे सांगताना त्यांनी म्हटले की, “जरांगे पाटलांच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. उर्वरित मागण्यांवर कार्यवाही सुरू आहे. समाजासाठी त्यांनी उभारलेला संघर्ष आदरणीय आहे. उपसमितीचा अध्यक्ष म्हणून केलेल्या कार्यवाहीची माहिती वेळोवेळी त्यांना देण्यात आली आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या काही नव्या मुद्द्यांवर शुक्रवार दि. २९ मे रोजी प्रत्यक्ष भेटीत चर्चा होणार आहे.”
जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप गैरसमजुतीतून झाल्याचे सांगत विखे पाटील म्हणाले की, “मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत ते टिकवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनीच केले आहे. उपसमितीचा अध्यक्ष म्हणून मी घेतलेले निर्णयही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातूनच झाले आहेत. त्यांची भूमिका कायम सकारात्मक राहिली आहे.”
“जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा सरकार एकत्रितपणे कार्यवाही करत असल्याचे समजून घ्यावे. एका व्यक्तीवर टीका करून प्रश्न सुटणार नाही. त्यांनी समाजासाठी जो लढा उभारला आहे, त्याबद्दल आजही सर्वांच्या मनात आदर आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांवर सतत टीका करून ते स्वतःचा जनाधार कमी करत आहेत,” असेही विखे पाटील यांनी नमूद केले.मराठा समाजाला यापूर्वी मिळालेल्या आरक्षणाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जाते, असे सांगत जरांगे पाटलांचे गैरसमज प्रत्यक्ष भेटीत दूर केले जातील, असा विश्वासही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.






