‘मन की बात’ मधील जलसंरक्षणाचा संदेश प्रेरणादायी – ना. राधाकृष्ण विखे पाटील

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- Narendra Modi यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमातील जलसंरक्षणाबाबतचा संदेश अत्यंत प्रेरणादायी असून, तो लोकचळवळ बनवण्याची गरज असल्याचे मत Radhakrishna Vikhe Patil यांनी व्यक्त केले.

‘मन की बात’च्या १३२ व्या भागामध्ये विविध विषयांवर भाष्य करताना पंतप्रधान मोदी यांनी ‘कॅच द रेन’ या उपक्रमाची संकल्पना मांडली. पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा हा संदेश अत्यंत उपयुक्त ठरणारा असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

देशातील विविध भागांमध्ये तयार करण्यात आलेल्या ‘अमृत सरोवर’ उपक्रमाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, छत्तीसगडमधील शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्नातून तलाव निर्माण करून पावसाचे पाणी साठवले. त्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली असून, हे उदाहरण इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

पंतप्रधानांनी दिलेले ‘पाऊस जिथे पडेल, तेव्हा साठवा’ हे ब्रीदवाक्य नागरिकांनी आत्मसात करण्याची गरज आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. पाणी हे निसर्गाचे अमूल्य वरदान असून ते पुढील पिढ्यांसाठी जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

याशिवाय, जलसंरक्षणासाठी गावागावात ‘जल समित्या’ सक्रिय करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. स्वच्छतेप्रमाणेच जलसंरक्षणातही लोकसहभाग वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मन की बात’ कार्यक्रमातून युवक आणि स्टार्टअप्सना जलव्यवस्थापनासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. जलशक्ती मंत्रालयाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने १५ एप्रिलपासून ‘जल पंधरवडा’ अभियान राबविण्यात येणार असून, या माध्यमातून जलसंरक्षण चळवळीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!