कार्यकर्त्यांनी गावपातळीवर पक्षाचा विचार पोहोचवावा – ना. राधाकृष्ण विखे पाटील
लोणी, दि. ६ (प्रतिनिधी) :-भाजपा हा केवळ राजकीय पक्ष नसून एक विचार असून, अंत्योदय ते विकसित भारत हा पक्षाच्या वाटचालीचा प्रवास जनतेच्या दृढ विश्वासावर उभा आहे. भविष्यात पक्षाचा जनाधार अधिक भक्कम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावपातळीवर पक्षाचा विचार पोहोचवण्यासाठी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या ४६व्या स्थापना दिनानिमित्त लोणी येथील जनसंपर्क कार्यालयात मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमास माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रवरा बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे, ज्येष्ठ नेते किसनराव विखे, नंदकिशोर राठी, मकरंद गुणे, व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, सोपानराव शिरसाठ, विजयराव लगड, बाजार समिती संचालक राहुल धावणे, सरपंच कल्पना मैड, सुनिल जाधव, जिल्हा भाजपाच्या सौ. शोभा घोरपडे, अनिल विखे, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, एन.डी. विखे, रविंद्र धावणे, अशोक धावणे, संजय आहेर, सोपान विखे, चांगदेव विखे, दिलीप विखे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला पक्ष असून, समर्पित कार्यकर्त्यांच्या मजबूत संघटनामुळे ही ओळख निर्माण झाली आहे. देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी भाजपाने ‘राष्ट्र प्रथम’ ही भूमिका कायम ठेवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सलग तीनवेळा भाजपाची सत्ता येणे हे लोकाभिमुख निर्णय व राष्ट्रीय धोरणांच्या यशस्वितेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला मिळालेल्या यशाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील यश हे जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. स्थापना दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.






