नगर दर्शन (वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील मापरवाडी परिसरात सोमवारी सायंकाळी वीज कोसळून एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत शेतकरी सोमनाथ जिजाबापू गाडगे (वय ३६) असे असून ते आपल्या कुटुंबासह शेती व्यवसाय करत होते. मापरवाडी भागात त्यांच्या दोन ठिकाणी शेती असून घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर त्यांनी कांद्याची लागवड केली होती.
घटनेच्या दिवशी त्यांनी काही महिला मजुरांकडून कांदा काढणीचे काम करून घेतले. दिवसभर काम सुरू असताना सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी महिला मजूर जवळच प्लास्टिकच्या आडोशाला थांबल्या.
दरम्यान, काही अंतरावर उभ्या असलेल्या सोमनाथ गाडगे यांच्यावर अचानक वीज कोसळली. मोठ्या आवाजासह ही घटना घडली असून त्यात ते गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून प्रशासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी केली जात आहे.






