इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नातील सोन्याची चोरी उघड

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात झालेल्या सोन्याच्या चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत श्रीरामपूर येथील दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने, मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण 2 लाख 89 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी फरार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 362/2026 भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान फिर्यादी यांचे सुमारे 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेले होते.

या घटनेचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी सागर सुरेश कांबळे हा आपल्या साथीदारांसह चोरी केलेल्या सोन्याची वाटणी करण्यासाठी ममदापूर फाटा परिसरात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सागर सुरेश कांबळे (वय 32, रा. रामनगर वार्ड नं.1, श्रीरामपूर) आणि बबलू उर्फ अब्दुल इब्राहिम पिंजारी (वय 36, रा. वार्ड नं.2, श्रीरामपूर) अशी आहेत.

पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी हा गुन्हा आणखी दोन साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. फरार आरोपींची नावे आतिक अयुब उर्फ आरिफ शेख आणि सनी विलास ढोकणे (दोघेही रा. वार्ड नं.2, श्रीरामपूर) अशी असून, त्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, आरोपींकडून 1 लाख 49 हजार 500 रुपये किमतीचे 11.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 70 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन तसेच 70 हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण 2 लाख 89 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ताब्यातील आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

जिल्ह्यात चैन स्नॅचिंग किंवा चोरी करणाऱ्या आरोपींबाबत माहिती असल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या 0241-2416111 किंवा डायल 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!