नगर दर्शन (वृत्तसेवा):- डॉ. विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दोन यशस्वी किडनी प्रत्यारोपण; आई-बहिणीच्या मूत्रपिंड दानातून दोन रुग्णांना नवजीवन Pravara Rural Hospital अंतर्गत कार्यरत डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने ग्रामीण भागातील दोन रुग्णांना नवजीवन देत आरोग्य क्षेत्रात पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने सुरू असलेल्या अवयव प्रत्यारोपण केंद्रात एका आईने आपल्या 36 वर्षीय मुलाला, तर एका बहिणीने आपल्या 48 वर्षीय भावाला मूत्रपिंड दान करून दोन यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या.
अहिल्यानगर जिल्ह्यातील 36 वर्षीय तरुण गेल्या दोन वर्षांपासून डायलिसिसवर होता. उपचारासाठी तो लोणी येथील प्रवरा मेडिकल रुग्णालयात दाखल झाला होता. तपासणीनंतर डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्याच्या आईने स्वतःचे मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील 48 वर्षीय व्यक्तीस त्यांच्या बहिणीने मूत्रपिंड दान केले. या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने संबंधित रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.
या महत्त्वपूर्ण शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सतीश महाजन, रुग्णालय प्रशासन संचालक डॉ. योगेंद्र सिंह, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश जगदाळे यांच्यासह अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी मोलाचे सहकार्य केले. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया डॉ. विपिन विभुते, डॉ. राहुल तांबे आणि डॉ. मनीषप्रसाद पाठक यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ टीमने यशस्वीरीत्या पूर्ण केली, तर अवयव प्रत्यारोपण समन्वयक ज्ञानेश्वर गाडेकर यांनी महत्त्वपूर्ण समन्वय साधला.
पद्मश्री Dr. Vitthalrao Vikhe Patil आणि लोकनेते Dr. Balasaheb Vikhe Patil यांनी ग्रामीण भागात जागतिक दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, असे स्वप्न पाहिले होते. आज Dr. Radhakrishna Vikhe Patil यांच्या नेतृत्वाखाली त्या स्वप्नांची यशस्वी पूर्तता होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केवळ अहिल्यानगरच नव्हे, तर मराठवाड्यासह राज्यातील सहा ते सात जिल्ह्यांतील गरजू रुग्णांना येथे जीवनदान मिळत आहे.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana आणि आयुष्मान भारत योजना Ayushman Bharat अंतर्गत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केली जाते. गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी 9975309705 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







