शिर्डीत २३-२४ मे रोजी संरक्षण साहित्याचे भव्य प्रदर्शन

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक तोफगोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनानिमित्त २३ आणि २४ मे २०२६ रोजी विद्यार्थी व नागरिकांसाठी संरक्षण साहित्याचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे प्रमुख आकर्षण ठरणार असून, विज्ञानप्रेमींसाठी ही अनोखी पर्वणी ठरणार आहे.

देशाचे संरक्षण मंत्री Rajnath Singh यांच्या हस्ते सावळीविहीर येथील औद्योगिक वसाहतीत निबे ग्रुपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास Devendra Fadnavis यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्ह्याला देशातील महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून नवी ओळख मिळणार आहे. या कारखान्यात १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचे उत्पादन होणार असून, दरवर्षी तब्बल पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे. विशेष म्हणजे संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान आणि कच्चा माल पूर्णपणे स्वदेशी आहे. अवघ्या एका वर्षात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे २०० एकर परिसरात विविध संरक्षण प्रकल्प विकसित केले जात असून, यामध्ये रॉकेट लाँचर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन तसेच विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित करण्यात येत आहेत.उद्घाटनाच्या निमित्ताने २३ व २४ मे रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विशेष संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या तसेच शंभरहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. प्रकल्पस्थळी मोठ्या प्रमाणात स्टॉल्स उभारण्यात आले असून, जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विज्ञानप्रेमी, महिला आणि नागरिकांना संरक्षण क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याला संरक्षण क्षेत्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. Mechanised Infantry Regimental Centre, रणगाडा प्रशिक्षण केंद्र आणि के.के. रेंजेस यामुळे जिल्ह्याला आधीपासूनच संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. नव्या संरक्षण उत्पादन प्रकल्पामुळे या ओळखीला आणखी बळ मिळणार आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!