शिवमहापुराण कथा कार्यक्रमात पाकीटमारी आणि सोन्याची चैन चोरणारी टोळी गजाआड

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा आयोजीत करण्यात आली होती. या त्याच्या कार्यक्रमासाठी देशभरातून लाखो महिला व पुरुष भाविक म्हणून सहभागी झालेले होते. सदर कथेमध्ये व शिर्डी मध्ये रॅली मध्ये येणाऱ्या भाविकांचे खिसे कापणे, महिलांच्या सोन्याच्या चैन कट करणे, भाविकांना मारहाण करून जबरी चोरी करणे या गैरकृत्यासाठी काही महिला व पुरुष आलेले आहेत अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी शिवमहापुराण कथा परिसरात गस्त घातली. संशयितरित्या फिरणाऱ्या महिला व पुरुषांचा वेळोवेळी वॉच ठेवला. संशयित महिला आणि पुरुषांना शोधून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुध्द दरोड्याची पुर्वतयारी अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४),३१०(५) प्रमाणे गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली. सदर गुन्ह्यातील महिला व पुरुष हे राजस्थान, हरियाणा राज्यातून व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून या गैरकृत्यासाठी सदर ठिकाणी आलेले होते. या संपूर्ण कार्यक्रमात चोऱ्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीसांनी आहोरात्रपणे पायी पॅट्रोलींग व वॉच ठेवून सदरची कारवाई केली. ताब्यात घेतलेले महिला व पुरुषांना गुन्ह्यांमध्ये अटक केली असून सर्वांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

सदरची कारवाई ही अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ तसेच लोणी पोलीस स्टेशनचे बंदोबस्तातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!