गरजू वृद्धाला मदतीचा हात – मानवतेचा एक सुंदर क्षण

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- आज संगमनेरमध्ये कुटे हॉस्पिटलसमोरील कॅन्टीनमध्ये एक अतिशय भावनिक प्रसंग अनुभवायला मिळाला. आम्ही जेवण आटोपून गप्पा मारत बसलो असताना, एक वृद्ध गृहस्थ पाणी पिण्यासाठी कॅन्टीनमध्ये आले. त्यांच्या पावलांमध्ये थरथर, अंगात शक्ती नसल्यासारखे दिसत होते. काळजी वाटल्याने आम्ही त्यांना विचारले,

“बाबा, कुठून आलात?”

त्यावर त्यांनी शांतपणे उत्तर दिलं,

“मी शेगावचा आहे. घरून रुसून आलो… घरी सुनबाई सांभाळीत नाही. इथे बरेच दिवस झाले. बसस्टँडवर झोपतो. जायचं आहे, पण पैसे नाहीत…”

त्यांचे शब्द ऐकून मन सुन्न झाले. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात माणूस ज्या ऊब, आधार आणि सुखाची अपेक्षा ठेवतो, तेच त्यांच्यापासून हरवलेले दिसत होते.

ही परिस्थिती पाहून आम्ही दुर्लक्ष करू शकलो नाही.जीवनदायी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. अनिल भुसाळ तसेच सहकारी मित्र लखन गव्हाणे यांनी तत्काळ पुढाकार घेत त्या वृद्धाला संगमनेर ते शेगाव जाण्यासाठी आवश्यक ती आर्थिक मदत केली.

मदत मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर आलेले समाधान, डोळ्यांत दाटलेले अश्रू… या सर्वांनी मन भरून आलं. त्या क्षणी जाणवलं की, एखाद्या गरजू व्यक्तीच्या आयुष्यातील छोटासा प्रकाश आम्ही बनू शकलो, हाच खरा आनंद आहे.

आजचा हा अनुभव पुन्हा एकदा आठवण करून देऊन गेला की मानवतेपेक्षा मोठं काही नाही.लहानशी मदतही एखाद्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते.

 

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!