नगर दर्शन (वृत्तसेवा):- येथील ग्रामदैवत सद्गुरू महाराज यात्रा उत्सव २० ते २२ एप्रिल दरम्यान भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. तीन दिवस चाललेल्या या यात्रेत धार्मिक विधी, भव्य मिरवणूक, कुस्तीचा जंगी हगामा आणि महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ यांसारख्या विविध कार्यक्रमांनी संपूर्ण सादतपूर व पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण केले.
यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी सद्गुरू महाराजांचा विधीवत अभिषेक सोहळा पार पडला. यंदा अभिषेकाचा मान संकेत सुभाष मगर व गणेश नानासाहेब काळे यांना मिळाला. सायंकाळी वाजत-गाजत भव्य काठी मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले. रात्री नेत्रदीपक फटाक्यांच्या आतषबाजीने वातावरण आणखी उजळून निघाले.यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमांना डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट देत सद्गुरू महाराजांचे दर्शन घेतले व ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच महिलांसाठी आयोजित ‘होम मिनिस्टर: खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमास धनश्री विखे पाटील यांनी उपस्थिती लावून महिलांचा उत्साह वाढवला.
दरम्यान, बालगोपाळांतील क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी दत्तात्रय बाजीराव मगर यांच्या शेतात ५ ते १५ वयोगटातील मुलांच्या कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात आले. या स्पर्धेत बालमल्लांनी उत्कृष्ट खेळ दाखवत उपस्थितांची मने जिंकली.अत्यल्प वेळेत आणि शिस्तबद्ध नियोजनातून यात्रा कमिटीने हा उत्सव यशस्वीरीत्या पार पाडला. महेश मगर, महेश काळे व ऋषी कडलग या तरुणांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच गावातील आजी-माजी सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, पोलीस प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते रवी डेंगळे आणि सर्व तरुण मंडळांनी दिलेल्या सहकार्यामुळे यात्रा निर्विघ्न पार पडली.यात्रेची सांगता उत्साहात झाली असून या उत्कृष्ट आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.







