नगर दर्शन (वृत्तसेवा):- लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका डॉक्टरसह एकूण 10 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सुमारे ₹24 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 29 एप्रिल 2026 रोजी रात्री पिंपरी निर्मळ शिवारातील निळवंडे कालव्याजवळील एका खोलीवर छापा टाकला. या ठिकाणी पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी सुरू असल्याचे उघड झाले. पोलिसांनी कारवाई करत आरोपींना रंगेहात पकडले.या प्रकरणात महाराष्ट्र मेडिकल अॅक्ट 1961 तसेच गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (PCPNDT) कायदा 1994 अंतर्गत विविध कलमांनुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या रॅकेटचा मुख्य आरोपी डॉ. राहुल आबासाहेब भनगे (BAMS) असून त्याच्यासह इतर 9 जणांचा समावेश आहे. सर्व आरोपी विविध जिल्ह्यांतील असून त्यांनी संगनमताने हा बेकायदेशीर व्यवसाय चालविल्याचे तपासात समोर आले आहे.कारवाईचा तपशील पाहता, 29 एप्रिल रोजी सायंकाळी माहिती मिळाल्यानंतर रात्री सुमारे 9:12 वाजता छापा टाकण्यात आला. त्यानंतर 30 एप्रिल रोजी पहाटे 5:39 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आणि सकाळी 5:56 वाजता आरोपींना अटक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
https://www.instagram.com/reel/DXvvaw6PlIh/?igsh=N25tYzVkMjM1ZWVn
पोलिसांनी या कारवाईत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सुमारे ₹4.5 लाख किमतीचे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, Swift, Ertiga आणि WagonR या तीन चारचाकी गाड्या, iPhone, Oppo, Vivo कंपनीचे मोबाईल फोन, रोख रक्कम, तसेच गर्भलिंग तपासणीसाठी वापरण्यात येणारे वैद्यकीय साहित्य व कागदपत्रांचा समावेश आहे.या प्रकरणात 8 महिलांची नावे समोर आली असून त्यांना विविध ठिकाणांहून वाहनांद्वारे आणून बेकायदेशीर तपासणी करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गर्भलिंग तपासणीसारख्या गंभीर गुन्ह्यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.







