नगर दर्शन (वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथे जुन्या वादातून जातीवाचक शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी 10 जणांविरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैशाली सोपान दिवे (वय 42, रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 6 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास त्या व त्यांचा मुलगा अखिलेश हे लोणी येथे बाजारासाठी जात असताना नाना फाटा परिसरात त्यांचा मित्र रोहित पल्हारे याचा ताब्या इनामदार याच्याशी मोटारसायकल कट मारल्याच्या कारणावरून वाद सुरू होता.
दरम्यान, फिर्यादींचा मुलगा अखिलेश हा वाद मिटविण्यासाठी गेला असता तेथे जमील इनामदार, रशीद इनामदार, बबन इनामदार, मसुद इनामदार, ताबेश इनामदार, दाणेश इनामदार, तसेच मुन्ना (पूर्ण नाव माहिती नाही) हे तेथे आले. यातील काहींच्या हातात लोखंडी कत्ती व दांडा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी “तुम्ही महार लय माजलेत” असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच अखिलेश दिवे याला मारहाण करण्यात आली. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या इतर युवकांनाही शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यावेळी फिर्यादी वैशाली दिवे यांचा पदर ओढून त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच लोखंडी कत्तीच्या उलट्या बाजूने हातावर मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे.यानंतर आरोपींनी “तुम्ही महारडे आमच्या नादी लागू नका, नाहीतर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0189/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 74, 118(1), 115(2), 351(2), 352, 189(2), 190, 191(2), 191(3) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(1)(w)(i), 3(2)(va) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास उपअधीक्षक अमोल रामदत्त भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती लोणी पोलिसांनी दिली.







